बंद

    मिशन लक्ष्यवेध

    • तारीख : 11/01/2014 -

    ऑलिंपिक, आशियाई व राष्ट्रकुल या सारख्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्यातील खेळाडूंना उल्लेखनिय कामगिरी करुन जास्तीत जास्त पदके प्राप्त व्हावीत या हेतूने सन २०२३-२४ वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये “मिशन लक्ष्यवेध” ही योजना ऑलिंपिक अभियान या योजने एवजी राबविण्याचे जाहिर करण्यात आले आहे.

    याकरिता निवडक १२ खेळांचे “उच्चक्षमता विकास केंद्र” (उच्च कार्यक्षमता केंद्र) स्थापन करण्यात येणार असून यामध्ये सर्वोच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा व क्रीडा साहित्य, क्रीडावैद्यक शास्त्र, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा साहित्य, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार याबरोबरच खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी विदेशी संस्थांचा सहभाग यांचा समावेश असणार आहे. अशाच प्रकारचे निवडक क्रीडा प्रकारांचे निपुणता केंद्र विभाग व क्रीडा प्रतिभा विकास केंद्र जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येणार आहे.

    ऑलिम्पिक, आशियाई, व कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी संपादित केलेली पदके, महाराष्ट्रातील खेळाडूंचा या स्पर्धेमधील सहभाग, नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवण्याची शक्यता या बाबींचे आधारे क्रीडा प्रकारांचे “अ”, “ब”, “क” आणि “ड” असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

    “अ” वर्गातील क्रीडा प्रकारांवर अधिक लक्ष केंद्रित करून या क्रीडा प्रकारांना अधिक चालना देण्याकरिता या अ वर्गातील ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या 12 क्रीडा प्रकारांकरिता हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. तसेच या योजनेच्या माध्यमातुन नागपूर, कोल्हापूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे सुसज्ज क्रीडावैद्यक शास्त्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

    इतर संवर्गातील क्रीडा प्रकार, खेळाडू व संबंधित घटकांना उपलब्ध करून द्यावयाच्या क्रीडा सुविधा, विदेशी क्रीडा मार्गदर्शकांची सेवा, क्रीडा स्पर्धा आयोजन, खेळाडूंना आर्थिक सहाय्य, पारितोषिके व पुरस्कार इ. याबाबतची प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.

    राज्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा सुविधा या बाबींचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने माहिती तंत्रज्ञानाचे सहाय्यक घेण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ संस्थेशी नियुक्ती करून क्रीडा क्षेत्राचा डेटाबेस तयार करण्यात येईल. यामध्ये खेळाडूंची वैयक्तिक माहिती, कामगिरी, स्पर्धा, पारितोषिके, प्रमाणपत्र, परीक्षण इ. बाबींचे एकत्रित प्रणाली निर्मिती व त्याद्वारे सर्व घटकांचा समावेश असलेली पारदर्शक व प्रभावी क्रीडा यंत्रणेची निर्मिती करण्यात येईल.

    लाभार्थी:

    खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटना

    फायदे:

    खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशांतर्गत आणि परदेशी संस्थांचा सहभाग यासह, उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि उपकरणे, क्रीडा औषध विज्ञान, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा उपकरणे, खेळाडूंसाठी प्रोत्साहन आणि पुरस्कार.

    अर्ज कसा करावा

    अधिक माहितीसाठी संपर्क साधा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे.